Sunday, April 19, 2020

बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.




           
               बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.
                                     
                                     प्रा. डॉ. राम ढगे,
                                     कर्जत.
                                      ९४०४९७९०९२.
आधुनिक माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा सर्वमान्य व सर्वश्रुत असा आविष्कार म्हणजे मोबाईल. इंग्रजांनी संपर्क व संभाषणासाठी इसवी सन १८८२ मध्ये भारतात दूरध्वनी सेवा सुरू केली. पुढे हा दूरध्वनी इंग्रज अधिकारी, कार्यालये याबरोबरच भारतातील तत्कालीन श्रीमंत लोकांकडे उपलब्ध झाला. अगदी १९९० - २००० च्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापर्यंत हा दूरध्वनी सामान्य माणसांच्या घरात पोहचू शकला नाही. दरम्यानच्या काळात भारतात मोबाईलचे युग सुरू झाले होते. इसवी सन २००० च्या दशकात मोबाईल युगाची क्रांती सुरू झाली, आणि अवघ्या वीस वर्षात भारतातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, कामगार, मजूर यांच्यापर्यंत आधुनिक संप्रेषणाची सुविधा अल्प खर्चात मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाली . सध्या माणसांच्या मूलभूत गरजांमध्ये मोबाईल या नवीन गरजेचा समावेश करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सेवा व सुविधांमुळे आणि त्याच्या वापराच्या नित्य सवयींमुळे माणूस मोबाईल शिवाय काही क्षण सुद्धा राहू शकत नाही. एक तर हातात किंवा खिशात मोबाईल नसेल तर माणूस अक्षरशः अस्वस्थ होतो. मोबाईल हा गॅझेट प्रमाणे अत्यंत महत्त्वाचे साधन समजले जात आहे.  माणसाला खीळ ठेवणाऱ्या अनेक सुविधा वापरल्या जातात, उदाहरणार्थ सोशल मीडिया, विविध गेम्स, व्यवसाय किंवा नोकरीसाठी आवश्यक ॲप्स, शिक्षण रोजगार यासाठीचे ॲप्स, मनोरंजनासाठीचे ॲप्स, त्याचप्रमाणे स्वतःची मते व  विचार प्रसारित करता येणारी समाज प्रसारमाध्यमे अशा अनेक सुविधांमुळे माणूस सध्या मोबाईलचा जणूकाही व्यसनी झालेला दिसतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक लहान मुले. तरुण, प्रौढ व्यक्ती घराबाहेर पडुन मैदानी खेळ खेळणे खेळण्याऐवजी जणूकाही मोबाईल लॉक डाऊन झाले आहेत. त्यांनी स्वतःच स्वतःला लॉक डाऊन करून घेतलेले आहे.                             सध्या कोरोना विषाणूच्या जागतिक संसर्गामुळे जगातील मानव जातीचे अतीव नुकसान होत आहे.जगाची प्रगती खंडित झाली, सर्व अर्थव्यवस्था स्थगित झाली तसेच मानवी जातीची असुरक्षितता वाढली आहे. या काळात जगातील सर्व देशांच्या शासनाने लॉक डाऊन व संचार बंदीचे आदेश दिले आहेत. जगातील प्रचंड लोकसंख्या आहे तेथेच थांबली आहे. अशा भयावह काळात माणसाला सध्या मोबाईल चांगली साथ देत आहे. फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गजन्य रोगाविषयी जागृती होत आहे. शासनाने काढलेले वेगवेगळे आदेश अल्पकाळात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी खूप मदत होत आहे. कोरोना संकट काळात अनेक तरुण फेसबुकवर विविध मोहिमा चालवत आहेत. जस की बार्शीतील एक युवक कोरोना विरोधात फेसबुक लाईव्ह वरून we will win मोहीम राबवित आहे.  यामुळे संकट काळातही जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होत आहे. मोबाईलचा वापर चांगला की वाईट याविषयी चर्चा करण्याऐवजी सर्व जगाला लॉक डाऊन मध्ये आहे तेथेच थांबून खिळवून ठेवण्याची ताकद असणाऱ्या व आधुनिक काळातील जागृतीचे उत्तम साधन म्हणून मोबाईलचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. म्हणूनच सध्या असे वाटते , बरे झाले देवा! मोबाईलचा शोध लावला.

पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड

       पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महा...