बारावी बोर्ड परीक्षा 2024 साठी राज्यशास्त्र विषयाची सराव नमुना उत्तरपत्रिका 02
रयत शिक्षण संस्थेचे,
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.
सराव उत्तर पत्रिका क्रमांक २: २०२४
विषय - राज्यशास्त्र
इयत्ता - बारावी वेळ - ३.०० तास गुण – ८०
-------------------------------------------------------------------
प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.(५)
१) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह-------.
( दविध्रुवितेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी)
२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना --------- या देशात संदर्भात वापरले जाते.
( भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका)
३) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टीकोण ------- वर लक्ष केंद्रित करतो.
(शिक्षण, लोक कल्याण, विकास, सक्षमीकरण)
४) चारू मुजुमदार-------- शी निगडित आहेत.
(JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी)
५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.
(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)
उत्तर - १) दविध्रुवितेचा अस्त २) चीन ३) सक्षमीकरण
४) नक्षलवादी चळवळ ५) पंडित नेहरू
प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)
(१) अ) NATO - युरोप
ब) ANZUS - आफ्रिका
क) SEATO - दक्षिण पूर्व आशिया
ड) CENTO - पश्चिम आशिया
उत्तर - ANZUS - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अमेरिका
(२) अ) जवाहरलाल नेहरू - Discovery Of India
ब) तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा - LTTE
क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - कलम ३७०
ड) पंचायत राज - ७३ वी घटना दुरुस्ती
उत्तर - क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - १९६१
(३) अ) दप्तर दिरंगाई - पारंपरिक प्रशासन
ब) पंचवार्षिक योजना - विकास प्रशासन
क) पारदर्शकता- आधुनिक प्रशासन.
ड) ऑनलाईन रेल्वे बुकिंग - ई- प्रशासन
उत्तर - क) पारदर्शकता- सुशासन
प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)
१) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.
(अ) अमेरिका
(ब) युनायटेड किंग्डम
(क) स्वीडन
(ड) रशिया
२) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ये याच्याशी निगडित आहे-
(अ) पंचायती राज
(ब) राष्ट्रीय एकात्मता
(क) राष्ट्र ही संकल्पना
(ड) Melting Pot ही संकल्पना
३) अलिप्ततावादाचा हा गाभा आहे.
(अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन
(ब) शीतयुद्धात सहभाग
(क) लोकशाही समाजवाद एक धोरण
(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण
४) भारताने नदी पाणीवाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.
(अ) बांगलादेश
(ब) पाकिस्तान
(क) चीन
(ड) नेपाळ
उत्तर - १) स्वीडन २) राष्ट्रीय एकात्मता ३) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन ४) बांगलादेश
प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)
१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-
२) समाजात भीती/ घबराट/धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -
३) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना -
४) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते -
उत्तर - १) लोकपाल आणि लोकायुक्त २) दहशतवाद ३) आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना ४) सॉफ्ट पॉवर
प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)
१) मोबाइल, सॅटॅलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन
२) दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद
३) जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी
४) हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, जंगलतोड
उत्तर - १) ग्रामोफोन २) राष्ट्रवाद ३) सोनिया गांधी
४) दारिद्र्य
प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (४)
उत्तर - १) भौगोलिक २) ऐतिहासिक ३) राजकीय
४) आर्थिक
प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (५)
१) शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)
२) युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले परंतु शेंगेनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)
३) शेंगेनचे सदस्य नसलेले परंतु युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा. (१)
उत्तर - १) स्पेन,फ्रान्स
२) नॉर्वे, रुमानिया
३) बेलारूस, युक्रेन
प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)
१) १९८० च्या दशकात या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात.
उत्तर - हे विधान चूक आहे.
कारण, 1990 च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात.
२) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.
उत्तर - हे विधान चूक आहे.
कारण, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे.
३) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.
उत्तर - हे विधान बरोबर आहे.
कारण, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक संरक्षणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.
४) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
उत्तर - हे विधान बरोबर आहे.
कारण, स्वातंत्र्य चळवळीमुळे सर्व भारतीय विविधता विसरून एकत्र आल्याने राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळ पोषक ठरली.
५) राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.
उत्तर - हे विधान चूक आहे.
कारण, लोकायुक्तांना फक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी विरोधात चौकशी करण्याचे अधिकार आहेत.
६) म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.
उत्तर - हे विधान बरोबर आहे.
कारण, प्राचीन काळापासून भारताचे म्यानमार सोबत आर्थिक, सांस्कृतिक संबंध आहेत.
७) सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.
उत्तर - हे विधान चूक आहे.
कारण, सागरमाला ही योजना बंदराधिरीत विकासासाठी आहे.
प्रश्न ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन) (९)
१) जागतिकीकरण आणि संस्कृती.
उत्तर -
1) जागतिकीकरण संस्कृतीचा वाहक आहे.
2) समाजात व्यक्तिवाद व भौतिक वाद वाढला आहे.
3) पारंपरिक मूल्यांचा पेक्षा आधुनिकीकरण व पाश्चिमात्यीकरण ही मूल्य अधिक महत्त्वाची वाटू लागले आहेत.
4) खानपानमध्ये बर्गर व पिज्जासारख्या परकीय खाद्यपदार्थांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
२) गरीबी आणि विकास.
उत्तर -
1)भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमीच राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याची जोड दिलेली आहे.
2) भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगीकरण होय. मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला.
3) भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने, उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला.
4) समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती, भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्याचबरोबर नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. खाजगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे.
३) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता.
उत्तर -
1) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत.
2) भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल.
3) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला.
4) प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली.
5) राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे.
४) सुशासन आणि ई- प्रशासन.
उत्तर -
1) सुशासन आणि ई-प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत.
2) माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती उपलब्ध होते.
3) नागरिकांच्या तक्रारींची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठी चे निर्णय त्वरेने आणि न्याय पूर्वक घ्यावे लागतात.
4) प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रति उत्तरदायित्व प्रस्तावित होते.
५) पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे परराष्ट्र धोरण.
उत्तर -
1) 7 सप्टेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
2) ज्यांच्या मुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्परविरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे.
3) इंग्लंड बरोबरच अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत.
4) चीन बरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
5) आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणतात, आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशिया साठी महत्त्वाचे आहे.
प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन). (१२)
१) आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद.
उत्तर - 1990 च्या दशकात आंतरराष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेच्या आधिपत्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आव्हान देण्याचा संघटित प्रयत्न अन्य देशांनी केला आहे. एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करणे गरजेचे आहे. या जाणिवेतून युरोपियन युनियनची स्थापना झाली. त्याचप्रमाणे रशिया, चीन, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावादाद्वारा सत्ता संतुलन जोपासले जाईल आणि अमेरिकेसारखी महासत्ता आपली मनमानी करू शकणार नाही, यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकता महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
२) पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज.
उत्तर - पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवती असणारे वातावरण आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव वनस्पती मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते. मानव निर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचा भाग समजला जातो. परंतु सध्या पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे या समस्या कमी करून आजच्या पिढीच्या गरजा कमी करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. मानव निर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होत आहे.उदा. हवामानातील बदल, वाढते प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची कमतरता, जैवविविधतेचा ऱ्हास अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. यावर एकच पर्याय आहे तो म्हणजे पर्यावरण संरक्षण ही आता काळाची गरज बनली आहे.
३) शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते.
उत्तर -
सार्वजनिक सुव्यवस्था स्थैर्य आणि शांतता यासाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. यात शांतताभंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना स्थान नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता असते. यांच्या अभावी देशात फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात. त्यामुळे राष्ट्रात एकी, शांतता व स्थैर्य राखणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. समाजात विविध गट असतातच, सर्व गटांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते. राष्ट्रांमध्ये लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे लोक असतात. त्यांच्यात शांतता आणि स्थैर्य असेल तर राष्ट्राची प्रगती होते. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राष्ट्राचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे, या कार्याला राष्ट्र उभारण्याचे कार्य असे संबोधले जाते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था यांची नितांत गरज असते.
४) हिंदी महासागरात भारताची भूमिका.
उत्तर -
1) हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे.
2) पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
3) प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
4) आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे. या खंडातील देशांच्या स्वातंत्र्यलढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्र निर्मितीच्या कार्याला भारताने पाठिंबा दिला आहे.
५) ई - प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.
उत्तर -
1) माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे त्यामुळे जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणावर ही प्रशासनाकडे वळत आहेत गेल्या काही दशकात प्रशासन गुंतागुंतीचे व वैविध्यपूर्ण होत आहे.
2) नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा ही अनेक पटीने वाढले आहेत. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणे हवी असेल तेव्हा ती परत मिळवणे, जलदगतीने पाठवणे शक्य झाले आहे.
3) माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवान पणे प्रक्रिया करणे सुलभ झाले आहे. यातून शासनाच्या कार्यपद्धतीला वेग घेण्यास, निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास, पारदर्शकता वाढविण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे.
4) ई-प्रशासन यामुळे भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती वाढविण्यास सहाय्य झाले आहे.
प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन) (१०)
१) सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर - सॉफ्ट पॉवर - अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सोफ्ट पॉवर होय. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. सॉफ्ट पॉवरमध्ये देशाची प्रतिष्ठा संस्कृती प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात.
अमेरिकन सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे खालील प्रमाणे-
अ) शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम - अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे.
ब) आंतरजाल -आंतरजाला द्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार हेसुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा भाग आहे.
क) फूड चेनस - अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादीची उदाहरणे आहेत.
२) जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणते आहेत.
उत्तर -
अ) सकारात्मक बाजू -
1) तरुणांसाठी आपल्या देशात आणि परदेशात नोकरी- व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.
2) खाजगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे.
3) आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जगाशी जोडले गेलो आहोत जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते.
ब) नकारात्मक बाजू -
1) राज्याच्या कल्याणकारी योजना स्थगित होण्याची शक्यता आहे.
2) स्थानिक उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील हे देखील भीती आहे.
3) शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत.
३) महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून भारतातील महिला सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा.
उत्तर -
महिला सक्षमीकरण - महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्या त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे होय.
भारतातील महिला सक्षमीकरणासाठीचे उपाय -
1) भारतातील कायदे व धोरण - भारतातील लोकशाही कायदे आणि विकासात्मक धोरणांच्या परिघात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रगतीसाठी धोरणे आणि कार्यक्रम आखण्यात आले. 1953 साली केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची (CSWB) स्थापना केली गेली. याचा उद्देश कुटुंब महिला आणि बालकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे हा होता.
2) भारत सरकारचा कल्याणकारी दृष्टीकोण - भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे. याचा मूळ उद्देश हा महिला मंडळे स्थापन करून महिलांचा विकास साधणे, धोकादायक कामांपासून महिलांचे संरक्षण, गर्भवती स्त्री आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे हा होता. 1970च्या दशकापासून कल्याणकारी योजना म्हणून शिक्षणावर भर देण्यात आला. आरोग्यविषयक कार्यक्रमांवर भर, मातृत्व आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य शिक्षण व पोषण, कुटुंब नियोजन हा होता.
3) महिला सक्षमीकरण - 1990 च्या दशकात विकासाची जागा सक्षमीकरनाने घेतली. शासनाला विकासाचे फायदे महिलांनाही करून द्यायचे होते. त्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी मध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जाऊ लागला. 1990मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली. भारताच्या संविधानातील 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्तीमुळे 1993 मध्ये पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले.
4) 2016 चे महिला राष्ट्रीय धोरण - 2016 मध्ये महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याची निर्मिती केली. यामुळे महिलांविरोधी सर्व प्रकारच्या विषयाची दखल घेतली. सामाजिक,आर्थिक, राजकीय, शासकीय संस्था व धोरण निर्मितीमध्ये महिलांना समान सहभाग करून घेणे, भेदभावाच्या सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवणे, सायबर स्पेस महिलांसाठी सुरक्षित बनवणे अशा धोरणांचा अमल करण्यात आला.
४) जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.
उत्तर - भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावयाचा होता. जम्मू काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी तेथील महाराजा हरिसिंग यांच्यावर दबाव टाकण्याकरता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने टोळीवाले काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. आणि तिथूनच जम्मू-काश्मीरमधील समस्येला सुरुवात झाली. हरीसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली. आणि जम्मू काश्मीर भारतात सामील झाले. मग भारताने काश्मीरच्या संरक्षणाकरता आपले सैन्य पाठवले, यातूनच 1947- 48 मध्ये पहिले भारत-पाक युद्ध झाले. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना भारताविरुद्ध भडवण्याच्या उद्देशाने 1965 मध्ये भारतात पाकिस्तानने घुसखोर पाठवले. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर प्रत्यक्ष आक्रमण केले तेव्हा स्थानिकांनी त्यांना सहकार्य केले नाही. 1965 मध्ये पाक लष्करशहा खान यांनी पाकव्याप्त काश्मीर मध्ये Plebiscite front ची स्थापना केली. या आघाडीचे अनेक अनधिकृत लष्करी गट नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या. 1977 मध्ये यालाच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नवीन नाव देण्यात आले. 1989मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. तसेच पुढे काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आल्या. आणि दिवसेंदिवस जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवाद आधुनिक स्वरूप घेत असताना आपल्याला दिसत आहे.
७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा. (१०)
१) भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर -
अ) भौगोलिक घटक - दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्य कडील हिमालय पर्वतांच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिला आहे. संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीन सारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. दक्षिण आशियात भारताच्या सर्व शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे, परंतु त्यापैकी कोणत्याही देशांची एकमेकांबरोबर सीमा नाही.दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे.
ब) ऐतिहासिक घटक - शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होतो. पश्चिम मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामांचाही यात समावेश होतो. वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दरम्यान आखली गेली होती.
क) आर्थिक घटक - अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय, सामाजिक तसेच आर्थिक संदर्भही आहे. वसाहती काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. आर्थिक मदती बरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारली आहे. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला आहे. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण याची धोरण अवलंबिल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले.
ड) राजकीय घटक - भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाची कार्यकारी मंडळ महत्त्वाचे भूमिका बजावते, तर संसद जागल्याची भूमिका बजावते. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव असतो. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या प्रधानमंत्री यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडविण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.
ई) आंतरराष्ट्रीय व्यवस्था - शीतयुद्धाच्या काळात दवीध्रुविय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. शीतयुद्ध उत्तर काळातील भारत-अमेरिका दरम्यानचा संवाद, 1960 च्या दशकानंतर चीन-पाकिस्तान संवाद आणि 1990 नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो.
२) जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर -
अ) सहभागात्मक - हा सुशासनातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे. जनतेचा आवाज आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या जातात. शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणी मध्ये सहभागी होण्याची संधी लोकांना यामुळे मिळते.
ब) पारदर्शकता - पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे. यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005 पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळवणे शक्य झाले आहे.
क) प्रतिसादात्मक - सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न याबाबतीत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणांची आखणी करते.
ड) उत्तरदायित्व - सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांची प्रति उत्तरदायी असायला हव्यात. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्यघटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते, ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कारवाईचा परिणाम होऊ शकतो. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असणे गरजेचे असते.
इ) कायद्याचे राज्य - संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्त्वाचे मूल्य आहे संविधानातील म्हणजे प्रशासनाला मार्गदर्शनाचे कार्य करतात कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते न्याय आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या हक्कांचे हमी दिली जाते.
समाप्त...
𝕊𝕦𝕟𝕚𝕝 𝕂𝕒𝕝𝕦𝕣𝕒𝕞 𝔻𝕒𝕓𝕙𝕒𝕕𝕖
ReplyDelete𝕊𝕦𝕟𝕚𝕝 𝔻𝕒𝕓𝕙𝕒𝕕𝕖
ReplyDelete