उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा
प्रा. डॉ. राम ढगे.
भारतीय संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. संविधान दिनी शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेने स्वीकारला, तो दिवस 26 नोव्हेंबर 1949 होता. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या केंद्रीय सामाजिक आणि सशक्तिकरण मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी संपूर्ण भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारने आंबेडकरांची 125 वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेच्या सर्व प्रमुख समित्या आणि विशेष करून मसुदा समितीने एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रमाने भारतीय संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान देशात लागू झाल्याने भारत देश खऱ्या अर्थाने सार्वभौम झाला, आणि संविधानाने या सार्वभौम भारताची सत्ता सामान्य नागरिकांच्या हातात दिली. म्हणून आपण 26 जानेवारी दिवस आनंदाने प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आमचा देश सार्वभौम झाला, प्रजासत्ताक झाला म्हणून आपण गर्व, अभिमान व्यक्त करतो. राष्ट्रीय सण साजरा करतो. ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहत आहोत अशा स्वातंत्र्य चळवळतील नेत्यांचे कार्य आणि अथक परिश्रमाने स्वतंत्र भारतासाठी ज्यांनी स्वतंत्र संविधान तयार केले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर, म्हणूनच या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो.
भारतीय संविधानातील तत्वे, उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे घटनाकरांना अपेक्षित होते. परंतु आपण आज पाहतो भारतीय संविधानाबद्दल देशातील सर्व नागरिकांमध्ये म्हणावी तेवढी जागृती झालेली दिसून येत नाही. परिणामी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी आजही प्रभावीपणे होताना दिसून येत नाही. यासाठी भारतीय संविधान, संविधानातील तत्वे, उद्दिष्टे देशातील जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक वाटते. सध्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात मशगुल असलेल्या तरुण पिढीमध्ये आपल्या देशातील संविधानाची मूल्य व तत्वे रुजवणे यासाठी विविध उपक्रम शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयामार्फत राबवणे आवश्यक आहे. भारतीय संविधानाचा उद्देश केवळ शासन संस्था निर्माण करणे असा नव्हता तर भारतीय समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याबरोबर सर्व नागरिकांना सुरक्षितता, स्वातंत्र्य, समान संधी आणि न्याय मिळवून देणे असाही आहे. भारतीय संविधान दिनानिमित्त देशातील सर्व नागरिकांनी आपल्या हक्क आणि कर्तव्यांप्रती जागृत होण्याची ही एक संधी आहे, असे समजावे. भारतीय संविधान हा आपल्या देशातील सर्वोच्च कायदेशीर आणि ऐतिहासिक दस्तऐवज असल्याने त्याप्रति श्रद्धा, आपुलकी, अभिमान, स्वाभिमान व्यक्त करून भारताच्या राष्ट्रीय एकता, अखंडता आणि समृद्धीसाठी सर्व नागरिकांनी आपल्यातील विविधता, भेदभावाची भावना बाजूला ठेवून एकत्र यावे. नागरिकांनी राष्ट्राची अखंडता व संविधानाचे रक्षण करण्याचा आजच्या दिवशी संकल्प करून खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा करावा अशी अपेक्षा वाटते.
👍👍
ReplyDelete