Monday, January 24, 2022

राष्ट्रीय मतदार दिवस - डॉ. राम ढगे.

                     राष्ट्रीय मतदार दिवस

      मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!
                                              डॉ.राम ढगे,
                                    महाराजा जिवाजीराव शिंदे,
                                         महाविद्यालय श्रीगोंदा.
आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जगातील सर्वात मोठ्या लोकशाही जनतेला मतदार दिवसाच्या शुभेच्छा.
भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून स्वातंत्र्य प्राप्त झाले. भारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही पर्वाला सुरुवात झाली. 26 जानेवारी या दिवशी भारत लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्याने गौरव केला जातो. त्या लोकशाहीत महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार होय. पारदर्शक निवडणुका या लोकशाहीचा पाया समजल्या जातात. निवडणुकीतील मतदान हा नागरिकांसाठी असलेला मूलभूत अधिकार आहे. ज्या अधिकाराद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला राजकीय हक्क प्राप्त झालेला आहे. भारतात होणारी प्रत्येक निवडणूक निकोप,पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. भारतातील साक्षरतेचे प्रमाण वाढूनही दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाची घसरणारी टक्केवारी या बाबीचा विचार करता भारतीय लोकशाहीत लोकांचा म्हणजेच मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी सन 2011 पासून भारत सरकारने निवडणूक आयोगाचा स्थापनादिन म्हणजेच 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यास सुरुवात केली.
भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होऊन आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, देशाच्या राजकीय प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व मतदारांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी शासनाकडून व विविध सामाजिक संस्थांकडून राष्ट्रीय मतदार दिनादिवशी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ मतदार जनजागृती रॅली, नवमतदारांची नोंदणी, लोकनृत्य, नाटक, संगीत, चित्रकला स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळेच खरे प्रतिनिधित्व पुढे येऊ शकते. तसेच एक मत सुद्धा प्रतिनिधित्व बदलू शकते. मतदार दिनानिमित्त देशातील सर्व मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, भारत हा युवकांचा देश आहे, अधिकाधिक युवक मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो.
भारतीय लोकशाहीला बळकट बनवण्यासाठी भारतीय लोकशाहीत सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे लोकसहभागाची! परंतु दुर्दैवानं अनेकांना असं वाटतं की जनता आणि लोकप्रतिनिधी हे दोन परस्परांपेक्षा भिन्न आणि संपूर्णतः स्वतंत्र असे घटक आहेत. वास्तवात लोकशाहीच काय, पण कोणतीही राज्यपद्धती ही नागरिकांच्या सहभागाशिवाय चालू शकत नाही. हा सहभाग निव्वळ मत देणं आणि आपलं मत व्यक्त करणं एवढ्यापुरता मर्यादित नाही. तर स्थानिक प्रतिनिधीकडे महत्त्वाचे प्रश्न नेण्यापासून ते प्रसंगी राज्य, केंद्र शासन निर्णयाविरुद्ध आंदोलनात सहभागी होण्यापर्यंत आपल्या सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत नियमित सामील व्हायला हवं. लोकशाहीत सामील होण्यासाठी आजच्या पिढीला वरदान मिळाले आहे, ते म्हणजे आधुनिक प्रसार आणि संपर्क माध्यमे होय. आजची तरुणाई सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसते. भारताच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी सोशल मीडियावर सकारात्मक दृष्टिकोनातून तरुणाईने सहभागी होऊन आपला सक्रिय राजकीय सहभाग वाढविणे आवश्यक आहे. तसेच मतदान एक राजकीय अधिकार असला तरी मतदानाविषयी नागरिकांमध्ये कर्तव्याची जाण निर्माण करणे, हे राष्ट्रीय कार्य म्हणून तरुण पिढीने पार पाडणे अपेक्षित आहे.
 चला तर आजच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाही शासन प्रक्रियेत सक्रिय सहभागाची शपथ घेऊ आणि भारतीय लोकशाहीला बळकट बनवू.

8 comments:

उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा

उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा प्रा. डॉ. राम ढगे. भारतीय संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. संविधान दिनी शासक...