Friday, March 4, 2022

बारावी बोर्ड परीक्षा 2024साठी राज्यशास्त्र विषयाची 80 गुणांची नमुना आदर्श उत्तरपत्रिका 03

 Welcome to Dr Ram Dhage's Blogspot.

  बारावी बोर्ड परीक्षा 2024साठी राज्यशास्त्र विषयाची 80 गुणांची आदर्श नमुना उत्तरपत्रिका 03


 रयत शिक्षण संस्थेचे,

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.

सराव परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक ३

विषय - राज्यशास्त्र

इयत्ता - बारावी वेळ - 3.०० तास गुण – ८०


-------------------------------------------------------------------

प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (५)                                        

१) .......... मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली

(१९९०, १९८५, १९९५, १९९९)

२) ..........आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे.

( जैतापूर, मुंबई, कोल्हापूर, नागपूर)

३) १९७० चे दशक हे संयुक्त राष्ट्रांचे ...........चे दशक होते.

(साक्षरता, लोक कल्याण, विकास, महिलांसाठी)

४) नक्षलवादी चळवळीची मुळे .......... चळवळीत सापडतात.

(काश्मीर, संयुक्त महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम)

५) ......... पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला.

(२००२,२००७,२००५,२०००) 

उत्तर - 1)१९८५ 2) जैतापूर 3) महिलांसाठी 4) तेलंगणा              5) २००५

प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)                                

(१) अ) पहिली आशियाई परिषद - १९४७

      ब) बांडुंग परिषद - १९५५

      क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९२०

      ड) बेलग्रेड परिषद - १९६१

(२) अ) पंचायती राज - ७३ वी घटना दुरुस्ती

     ब) आझादी चळवळ- पश्चिम बंगाल

     क) IAS - भारतीय प्रशासकीय सेवा

     ड) बाबरी मशीद घटना- हिंदू-मुस्लिम दंगली

(३) अ) भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी - विप्रो

      ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- ONGC

      क) ट्रान्स नॅशनल कंपनी - जनरल इलेक्ट्रिकल

      ड) अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी - मॅकडोनाल्ड

उत्तर - 1) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९४५

           2) आझादी चळवळ - जम्मू काश्मिर

            3) ट्रान्स नॅशनल कंपनी- नेस्ले

प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)                                        

१) १९९१ नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला ;कारण------

(अ) सोवियत रशियाचे विघटन झाले.

(ब) अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले.

(क) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले. 

(ड) एकसंघ व्यवस्थेचा उदय झाला.

२) ७३वी घटना दुरुस्ती करण्यात आली; कारण----

(अ) पंचायती राज सक्षम करण्यासाठी.

(ब) महिला सक्षमीकरणासाठी.

(क) मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षाची करण्यासाठी.

(ड) मूलभूत हक्क रक्षणासाठी.

३) भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली; कारण-----

(अ) राज्यकारभार कार्यक्षम करण्यासाठी.

(ब) अस्तित्वात असलेली राज्य आकाराने मोठी होती.

(क) देशातील प्रदेशांची संस्कृती ओळख निर्माण करण्यासाठी.

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले; कारण----

(अ) जागतिकीकरणाचा प्रसार झाला. 

(ब) सामाजिक माध्यमात अभिसरण वाढले.

(क) परदेशातून स्वस्त कर्ज उपलब्ध होऊ लागले. 

(ड) महागाई कमी झाली.

उत्तर - 1) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले.

           2) पंचायतीराज सक्षम करण्यासाठी.

           3) देशातील प्रदेशांची संस्कृतीक ओळख निर्माण करण्यासाठी.

           4) जागतिकीकरणाचा प्रसार झाला.

प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)                                 

१) शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव-

२) भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय -

३) चीनचा महत्वकांक्षी प्रकल्प-

४) पात्र व्यक्तींना २६ युरोपीय देशांमध्ये मुक्त पुणे प्रवास करण्याची परवानगी -

उत्तर - 1) दारिद्र्य / गरिबी  2) अलिप्ततावाद 3) वन बेल्ट वन रोड 4) शेंगेन व्हिसा

प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)                            

१) दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे.

२) अक्साईचिन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय 

३) आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन

४) भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद

उत्तर - 1) आधार कार्ड देणे 2) दलाई लामा 3) बुलेट ट्रेन 4) राष्ट्रवाद

प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (४)                                    


उत्तर - 1) बांगलादेश 2) नेपाळ 3) थायलंड 4) भूतान

प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (५)                                       

१) हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                             

२) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)

३) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत नसणाऱ्या कोणत्याही एका देशाचे नावे लिहा. (१)     

                  


  उत्तर - 1) मालदीव, इंडोनेशिया    

            2) श्रीलंका, म्यानमार

            3) पाकिस्तान

प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)                                           

१) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, मास्त्रीक्त करार युरोपियन युनियनच्या स्थापनेसाठी करण्यात आला होता.

२) भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सहकारी चळवळीचे तत्त्वज्ञान त्यात सहभागी सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे आहे.

३) हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल या स्वतंत्र बाबी आहेत.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांचा निकटचा संबंध आहे.

४) राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, विविध समाज घटकांशी भिन्नतेमुळे अडचणी निर्माण होतात.

५) पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, पारंपरिक प्रशासनात दप्तर दिरंगाई व लालफितीचा कारभार हे दोष होते.

६) आज व्हिएतनाम भारताचा महत्वाचे भागीदार देश आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, अमेरिकेच्या व्हिएतनाम मधील हस्तक्षेपाला भारताने विरोध केला होता.

७) राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, राष्ट्रीय एकात्मता समुदायाचे समर्थन करते, विविधतेतून एकात्मता साध्य करते.

 ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन) (९)                                           

१) हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर.

उत्तर - 

1) जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो.

2) हार्ड पॉवर मध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात.

3) सॉफ्ट पॉवर मध्ये देशाची प्रतिष्ठा सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात.

4) अमेरिका, रशिया या महासत्ता हार्ड पॉवर सॉफ्ट पॉवर ही उदाहरणे आहेत.

२) भारतीय संस्कृती आणि प्रसार माध्यमे.

उत्तर - 

1) जागतिकीकरणाच्या कालखंडात प्रसार माध्यमांचा विस्तार झाला.

2) पश्चिमात्य उदार व आधुनिक विचारांना बरोबरच भोगवादी मूल्यांचा प्रसार झाला.

3) भारतीयांनी चुकीची पाश्चिमात्य मूल्य स्वीकारून पारंपरिक मूल्यांना तिलांजली दिली.

4) प्रसारमाध्यमांनी भारतीय पारंपरिक मुले व संस्था कमकुवत व शिथिल करण्याचे कामगिरी बजावली.

३) लिंगभाव असमानता आणि स्त्रियांवर होणारे अन्याय.

उत्तर - 

1) लिंगभाव असमानता ही व्यापक समस्या आहे त्याचा परिणाम म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगार संधी नाकारल्या जाणे किंवा स्त्री-पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता असणे.

2) जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालकांना चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात.

3) आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसते.

4) स्त्रियांना हिंसा व भेदभावासही सामोरे जावे लागते. अशाप्रकारे लिंगभाव असमानता ही स्त्रियांवर होणारे अन्यायाचे मूळ स्रोत आहे.

४) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता.

उत्तर - 

1) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत.

2) भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल.

3) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला.

4) प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली.

5) राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

५) अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान - बहुध्रुवियव्यवस्थेचा उदय.

उत्तर - 

1) सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर जागतिक व्यवस्थेवर अमेरिकेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले होते.

2) अलीकडच्या काळात अमेरिकेच्या वर्चस्वाला युरोपियन युनियन, चीन, जपान भारत आणि रशिया यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आव्‍हान दिले आहे.

3) प्रादेशिक संघटनांचे महत्त्व वाढलेले आहे.

4) प्रादेशिक संघटना आणि नव अर्थव्यवस्थाचा उदय यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे रूपांतर बहुध्रुवीय व्यवस्थित झाले आहे.

प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन). (१२)                                   

१) आधुनिक दहशतवाद.

उत्तर - 

1) पारंपरिक दहशतवादाच्या तुलनेत आधुनिक दहशतवाद अधिक कडवा, सुसंघटित आणि भयावह आहे.

2) पारंपरिक दहशतवाद विशिष्ट देशा पुरता सीमित होता. आधुनिक दहशतवादाने ती सीमारेषा ओलांडून आंतरराष्ट्रीय जागतिक व्याप्ती प्राप्त केली आहे.

3) आधुनिक दहशतवाद अमूर्त स्वरूपाची धार्मिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चा संघर्ष आहे.

4) सम्यूअल हंटिगटन या विचारवंताने यास दोन संस्कृतीमधील संघर्ष म्हणजेच पाश्चात्त्य संस्कृती आणि कडवे इस्लामी यांच्यातील संघर्ष असे म्हटले आहे इस्लामी कडव्या दहशतवादी संघटना जगात सर्वत्र सक्रिय आहेत.

5) आधुनिक दहशतवादी संघटना त्यांच्या सदस्यांना धार्मिक प्रचार प्रसाराच्या नावाखाली दहशतवादी कृत्य घडवतात.

२) जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात.

उत्तर -

1) जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात, या विधानाशी मी सहमत आहे.

2) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे संपूर्ण जगच एक बाजारपेठ किंवा व्यापारपेठ बनले आहे.

3) जागतिकीकरणानंतर संपूर्ण जगात वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीवरील निर्बंध दूर झाले आहेत.

4) जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय उद्योग व व्यापार संस्थांचा विविध क्षेत्रात प्रवेश झाला आहे.

5) जागतिकीकरणातील निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे ग्राहकांपर्यंत दर्जेदार वस्तू व सेवा सध्या उपलब्ध होत आहे.

३) पर्यावरण ऱ्हासातून अनेक समस्या उद्भवतील.

उत्तर - पर्यावरण ऱ्हासामुळे जगासमोर पुढील समस्या उद्भवतील.

1) हवामान बदल - हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे यामुळे दुष्काळ, वनवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात.

2) प्रदूषण - हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल यांच्यात निकटचा संबंध आहे हरितगृह वायू मुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच त्याशिवाय महानगरांमध्ये दातदुखी यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते.

3) जंगल तोडीतून उद्भवणाऱ्या समस्या - जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलांवर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

4) पाण्याची कमतरता-  लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे ही लोकांसमोर येईल मोठी समस्या आहे.

5) जैवविविधतेचा ऱ्हास - हवामान बदल हे ही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्नसुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो.

४) राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते.

उत्तर -

  1)राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते या विधानाशी मी सहमत आहे. कारण,

2) सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून राज्य त्यांचे राष्ट्रीय ओळख निर्माण करते.

3) लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक गटांचे एकत्रीकरण करून राज्य राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करते.

4) राज्य आणि जनता यामध सुसंवाद घडवून आणण्यासाठी लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा-आकांक्षा जाणून घेते.

5) सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करते. नागरिक यावेळी समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जगतात आणि परस्परांशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र एकसंघ राहते.

५) भारत ही एक उगवती सत्ता आहे.

उत्तर - 

1) भारत हा एक उगवती सत्ता आहे या विधानाशी मी सहमत आहे.

2) विसाव्या शतकात चीन आणि भारताचा समावेश उगवत्या सत्तांत करण्यात येऊ लागला आहे.

3) लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा मोठा देश आहे. तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थापैकी एक आहे. तसेच भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे.

4) आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे यामुळेच जगातल्या सर्वात मोठ्या वीस अर्थव्यवस्थांच्या व्यासपीठावर म्हणजेच जी-20 फोरम मध्ये भारताला स्थान मिळाले आहे.

5) सर्वाधिक दराने वृद्धीगंत होणाऱ्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्यात येतो, म्हणजेच भारत हि एक उगवती सत्ता आहे.

प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन) (१०)                                            

१) युरोपियन संघाचे विवरण करा.

उत्तर -

1) दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आहे. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली.

2) 7 फेब्रुवारी 1992 रोजी मासत्रिक्त करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली.

3) या करारामुळे सहकार्याचा परीक वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार न्यायालयीन बाबी परराष्ट्र आणि संरक्षण धोरणचा समावेश झाला.

4) या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो या समान चलनाच्या उदय झाला. युरो हे युरोपीय संघातील 28 पैकी 19 यांचे अधिकृत चलन आहे. या देशांना एकत्रितपणे युरोझोन म्हणून ओळखले जाते.

5) निव्वळ आर्थिक संघटनांच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन आता हे संघटन हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्रसंबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

6) शेंगेण प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते शेंगेन कराराद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमा नष्ट करण्यात आल्या. शेंगेंन व्हिसा पात्र व्यक्तींना सव्वीस सहभागी देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते.

२) ट्रान्स नॅशनल कंपनी म्हणजे? काय ट्रान्स नॅशनल कंपनी यांच्या उदयाचे सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाले आहेत?

उत्तर - ट्रान्स नॅशनल कंपनी - व्याख्या - 

ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करीत होत्या ते आता परदेशी व्यापार करू लागल्या. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झाले त्यांना ट्रान्स नॅशनल कंपनी असे म्हणतात.

ट्रान्स नॅशनल कंपन्यांचा सर्वसामान्य माणसावर परिणाम -

1) कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्‍चिम आशिया अमेरिका युरोप इत्यादी ठिकाणी काम करीत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढली आहे.

2) लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपनी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेत टिकुन आहेत.

3) शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थी शिवाय ते थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत.

३) भारत-अमेरिका संबंधांचा संक्षिप्त आढावा घ्या.

उत्तर - 

1) अमेरिका ही शीतयुद्धकाळातील दोन महासत्तापैकी एक महासत्ता होती. आज शीतयुद्धात तर जगातील ती एकमेव महासत्ता आहे.

2) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ.डी.रुझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, भारत स्वतंत्र झाल्यानंतर शीतयुद्धाच्या काळात संबंध बहुतांशी तणावाचे राहिले. काश्मीर प्रकरणात अमेरिकेने भारताच्या भूमिकेला सतत विरोध केला.

3) शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर ही भारत-अमेरिका संबंध लगेच सुधारले नाहीत. भारताला अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरता अमेरिकेने रशियावर दबाव आणला. 1998 मधील भारताच्या दुसऱ्या अनुचाचणी नंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते.

4) विसाव्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचे स्वरूप बदलू लागले. भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला. पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांनी 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारे सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवावे असे पाकिस्तानला बजावले. 2008 मधील भारत-अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशांच्या संबंधांना वेगळे वळण मिळाले आहे.

5) भारत आणि अमेरिका या दोन देशातील व्यापार आणि संरक्षण विषयक संबंध उत्तरोत्तर दृढ होत गेले आहेत.

४) दारिद्र्य विषयक पारंपरिक दृष्टिकोन विशद करा.

उत्तर - 

1) संयुक्त राष्ट्रांच्या दारिद्र्याच्या व्याख्येत दारिद्र्य विषयक पर्यायी दृष्टिकोन स्पष्ट होतो. संयुक्त राष्ट्रांनी असे प्रतिपादन केले होते की, दारिद्र्य म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो.

2) संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या मते, दारिद्र्य म्हणजे रोजगाराच्या योग्य संधी व पर्यायांचा अभाव, मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन, समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवणे इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे तसेच कर्ज मिळण्या इतकी पत नसणे. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो.

3) विकासाचा पर्यायी पारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीचा भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टीकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहवासाला महत्त्व देतो. जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते.

प्रश्न ७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा. (१०) 

१) भारतातील महिलांची स्थिती.

उत्तर -

 अ) आर्थिक असमानता - 

भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री-पुरुषांमधील वेतनातील दरी होय त्याचबरोबर सर मेकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी 28.2 टक्के इतकी कमी आहे तर तुलनेने पुरुष 78.8 टक्के आहेत.

ब) तस्करी व शोषण - 

2013 साले संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. यापुढे असे नमूद केले आहे की, त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात. त्यांना मोलकरीण म्हणून राबवून घेण्यात येते आणि कालांतराने परित्यक्त केले जाते.              

 क) साक्षरतेचे प्रमाण- 

भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे 2011 च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरूषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.5 टक्के आहे तर महिलांमधील प्रमाण 65.46 टक्के आहे.

 ड) राजकीय प्रतिनिधित्व  - 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधिमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिलेले आहे.

समारोप - भारतात आजही पुरुष प्रधान सामाजिक स्थिती असल्याने महिलांबाबत आजही अनेक समस्या आहेत.

२) स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घ्या.

उत्तर - स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताच्या काही प्रमुख समस्यांचे ववरण पुढील प्रमाणे आहे.

अ) आर्थिक समस्या- 

1947 आली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतासमोर आर्थिक मागासलेपणा, दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता इत्यादी समस्या होत्या. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. या समस्यांची तीव्रता सध्या कमी झाली आहे.

 ब) देशी संस्थानांचे विलीनीकरण - 

भारत स्वातंत्र्य कायदा, 1947 अन्वये भारताचे भारत व पाकिस्तानात फाळणी झाली. तसेच देशातील देशी संस्थानांना स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या राज्यकर्त्यांना भारत किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. हैदराबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर या संस्थानांच्या विलीनीकरणानंतर अडचणी उद्भवल्या. मात्र 1948 अखेर सर्व देशी संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

 क) भारत-पाकिस्तान संघर्ष - 

जम्मू-काश्मीर या संस्थांच्या विलीनीकरणाच्या प्रश्‍नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947 साली युद्ध उद्भवले. तेव्हापासून हा प्रश्न अनिर्णित अवस्थेत आहे. याच प्रश्नावरून 1965, 1971 आणि 1998 साले युद्धे झाली. या व्यतिरिक्त अघोषित युद्ध म्हणजेच सीमेपलीकडील दहशतवादाने जम्मू-काश्मीर क्षेत्रात अशांतता निर्माण केली आहे.

 ड) पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामीलीकरण - 

1947 आली भारतीय उपखंडात फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्या काही वसाहती होत्या. 1960 च्या दशकात या वसाहतींच्या भारतात सामीलीकरनाची प्रक्रिया पूर्ण झाली. 

ई) फुटीरतावादी चळवळी - 

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारताला नागा बंडखोरांचा फुटीरतावादी चळवळी शील संघर्ष करावा लागला कालांतराने मिझोराम मेघालय आणि त्रिपुरा फुटीरतावादी चळवळी फोफावल्या 1970च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ उद्भवली या सर्व चळवळीतून उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण भारत सरकारने केली आहे.

समारोप - स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, भाषिक  विविधतेमुळे भारताला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

समाप्त

6 comments:

  इ. १२ वीचा निकाल २१/०५/२०२४ रोजी दुपारी १:०० नंतर खालील साईटवर पहा. 1. https://hsc.mahresults.org.in/