Sunday, April 19, 2020

बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.




           
               बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.
                                     
                                     प्रा. डॉ. राम ढगे,
                                     कर्जत.
                                      ९४०४९७९०९२.
आधुनिक माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा सर्वमान्य व सर्वश्रुत असा आविष्कार म्हणजे मोबाईल. इंग्रजांनी संपर्क व संभाषणासाठी इसवी सन १८८२ मध्ये भारतात दूरध्वनी सेवा सुरू केली. पुढे हा दूरध्वनी इंग्रज अधिकारी, कार्यालये याबरोबरच भारतातील तत्कालीन श्रीमंत लोकांकडे उपलब्ध झाला. अगदी १९९० - २००० च्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापर्यंत हा दूरध्वनी सामान्य माणसांच्या घरात पोहचू शकला नाही. दरम्यानच्या काळात भारतात मोबाईलचे युग सुरू झाले होते. इसवी सन २००० च्या दशकात मोबाईल युगाची क्रांती सुरू झाली, आणि अवघ्या वीस वर्षात भारतातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, कामगार, मजूर यांच्यापर्यंत आधुनिक संप्रेषणाची सुविधा अल्प खर्चात मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाली . सध्या माणसांच्या मूलभूत गरजांमध्ये मोबाईल या नवीन गरजेचा समावेश करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सेवा व सुविधांमुळे आणि त्याच्या वापराच्या नित्य सवयींमुळे माणूस मोबाईल शिवाय काही क्षण सुद्धा राहू शकत नाही. एक तर हातात किंवा खिशात मोबाईल नसेल तर माणूस अक्षरशः अस्वस्थ होतो. मोबाईल हा गॅझेट प्रमाणे अत्यंत महत्त्वाचे साधन समजले जात आहे.  माणसाला खीळ ठेवणाऱ्या अनेक सुविधा वापरल्या जातात, उदाहरणार्थ सोशल मीडिया, विविध गेम्स, व्यवसाय किंवा नोकरीसाठी आवश्यक ॲप्स, शिक्षण रोजगार यासाठीचे ॲप्स, मनोरंजनासाठीचे ॲप्स, त्याचप्रमाणे स्वतःची मते व  विचार प्रसारित करता येणारी समाज प्रसारमाध्यमे अशा अनेक सुविधांमुळे माणूस सध्या मोबाईलचा जणूकाही व्यसनी झालेला दिसतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक लहान मुले. तरुण, प्रौढ व्यक्ती घराबाहेर पडुन मैदानी खेळ खेळणे खेळण्याऐवजी जणूकाही मोबाईल लॉक डाऊन झाले आहेत. त्यांनी स्वतःच स्वतःला लॉक डाऊन करून घेतलेले आहे.                             सध्या कोरोना विषाणूच्या जागतिक संसर्गामुळे जगातील मानव जातीचे अतीव नुकसान होत आहे.जगाची प्रगती खंडित झाली, सर्व अर्थव्यवस्था स्थगित झाली तसेच मानवी जातीची असुरक्षितता वाढली आहे. या काळात जगातील सर्व देशांच्या शासनाने लॉक डाऊन व संचार बंदीचे आदेश दिले आहेत. जगातील प्रचंड लोकसंख्या आहे तेथेच थांबली आहे. अशा भयावह काळात माणसाला सध्या मोबाईल चांगली साथ देत आहे. फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गजन्य रोगाविषयी जागृती होत आहे. शासनाने काढलेले वेगवेगळे आदेश अल्पकाळात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी खूप मदत होत आहे. कोरोना संकट काळात अनेक तरुण फेसबुकवर विविध मोहिमा चालवत आहेत. जस की बार्शीतील एक युवक कोरोना विरोधात फेसबुक लाईव्ह वरून we will win मोहीम राबवित आहे.  यामुळे संकट काळातही जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होत आहे. मोबाईलचा वापर चांगला की वाईट याविषयी चर्चा करण्याऐवजी सर्व जगाला लॉक डाऊन मध्ये आहे तेथेच थांबून खिळवून ठेवण्याची ताकद असणाऱ्या व आधुनिक काळातील जागृतीचे उत्तम साधन म्हणून मोबाईलचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. म्हणूनच सध्या असे वाटते , बरे झाले देवा! मोबाईलचा शोध लावला.

Friday, March 20, 2020

SSC बोर्ड परीक्षा 2023 साठी भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न - योग्य- अयोग्य व भौगोलिक कारणे


SSC बोर्ड परीक्षा 2023 साठी भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरा सह -
योग्य- अयोग्य व भौगोलिक कारणे



प्रश्न-  खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.

(१) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
उत्तर- योग्य

(२) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-
भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे.

(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी
आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान- ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा
जास्त आहे.

(४) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
उत्तर- योग्य

(५) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा
लाभला आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान- ब्राझील देशाला अटलांटीक महासागराचा किनारा लाभला आहे.

(६) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

(७) भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात.
उत्तर- योग्य

(८) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा
परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
उत्तर- योग्य

(९) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान
ऋतू असतात.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असुु शकत नाहीत.

(१०) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
उत्तर- योग्य

(११) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या
प्रमाणात पाऊस पडतो.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-.ब्राझील देशात आग्नेय ईशान्यदिशेकडून येणाऱ्या  पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.



प्रश्न- पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा.


(१) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
उत्तर : 
(१) दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत
वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीदवारे अडवले जातात.
(२) हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत
जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व बाझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते.
(३) ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य
पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो..

(२) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
उत्तर : 
 (१) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय
वाऱ्यांमळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखादया देशातीलसमुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.
(२) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण
कटिबंधात आहे.
(३) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही..

(३) ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे
उत्तर : 
(१) कृमी व कोटक है प्रामुख्यान घनदाट वनांन प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.
(२) झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी वर
खादय असते.
(३) ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे.
नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पटना
दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीट
संख्या जास्त आहे.

(४) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
उत्तर : 
 (१) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(३) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्यावाढत आहेत. भारतात 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

(५) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.
उत्तर : 

(१) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे
प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये ‘रोका' या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
(३) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.

(६) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
उत्तर : 
 (१) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेकवसाहतवादयांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.
(२) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.
(३) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उदयोगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

(७) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
उत्तर : 
 (१) शेतीतील प्रगती, उदयोगांचा विकास, शिक्षणाचा
प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत.
(२) या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.'
(३) या शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.'

(८) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
उत्तर : 
(१) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या
पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
(२) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
(३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात, म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

(९) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
उत्तर : 
(१) उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय
भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उदयोगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.
(२) याउलट, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगढ पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.
(३) दिल्ली व चंदीगढ या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय
कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.


(१०) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
उत्तर : 
 (१) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस
किमी आहे. याउलट भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे ३२,८७,२६३ चौरस किमी आहे.
(२) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे २० कोटी आहे. याउलट,भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे.
(३) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व
लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

(११) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
उत्तर : 
 (१) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे
सह-अस्तित्व असते.
(२) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उदयोग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
(३) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य,
शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.


(१२) ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.
उत्तर : 
(१) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
(२)ब्राझीलमधील बहतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
(३) ब्राझीलमधील नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणन
(अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.

(१३) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे.
उत्तर : 
(१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या
प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
(२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उदयोग भरभरातीस आले आहेत.
(३) या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे.

(१४) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो.
उत्तर : 
(१) वाहतूक मार्गाचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहना
दसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते.
(२) वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांस चालना मिळते.
(३) वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व
आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, देशाचे उत्पन्न वाढते. म्हणून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो.

(१५) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
उत्तर : 
 (१) जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे.
त्याचप्रमाणे, जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते.
(२) आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात
निर्यात केली जाते.
(३) आतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गाचा वापर केला असता कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.


SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव वस्तुनिष्ठ प्रश्न जोड्या, वेगळा घटक,अचूक पर्याय


 SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न उत्तरासह-

 (जोड्या,वेगळा घटक आणि अचूक पर्याय)






प्रश्न- जोड्या जुळवा
प्रश्न- वेगळा घटक ओळखा.
प्रश्न . अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

प्रश्न- जोड्या जुळवा :

'अ' गट                                 'ब' गट
(१) सदाहरित वने               (अ) सुंद्री
(२) पानझडी वने                (ब) पाइन
(३) समुद्राकाठची वने          (क) पाव ब्राझील
(४) हिमालयीन वने              (ड) खेजडी
(५) काटेरी व झुडपी वने       (ई) साग
                                       (फ) आमर
                                        (ग) साल
उत्तर- (१)- क (२)-इ (३)-अ (४)-ब (५)-ड

'अ' गट                                 'ब' गट
(१) ट्रान्स अॅमेझॉलियन मार्ग    (अ) पर्यटन स्थळ
(२) रस्ते वाहतूक                   (ब) भारतातील रेल्वे स्थानक
(३) रिओ दी जनेरिओ            (क) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(४) मनमाड                         (ड) प्रमुख रस्ते मार्ग
                                         (ई) ४०° पश्चिम रेखावृत्त
उत्तर- (१)- ड (२)-क  (३)-इ (४)-ब 


 प्रश्न- वेगळा घटक ओळखा.

(१) ब्राझीलमधील वनप्रकार.
(अ)काटेरी झुडपी वने
(ब) सदाहरित वने
(क) हिमालयीन वने
(ड) पानझडी वने

(२) भारताच्या संदर्भात -
अ) खारफुटीची वने
(ब) भूमध्य सागरी वने
(क) काटेरी झुडपी वने
(ड) विषुववृत्तीय वने

(३) ब्राझीलमधील वन्य प्राणी.
 (अ) अॅनाकोंडा
 (ब) तामिर
 (क) लाल पांडा
 (ड) सिंह

(४) भारतीय वनस्पती.
(अ) देवदार
(ब) अंजन
(क) ऑर्किड
(ड) वड.

(५) हिमालयातील वनांतील वृक्ष.
(अ) पाईन
(ब) पिंपळ
(क) देवदार
(ड) फर.

उत्तरे : (१)-(क); (२)-(ड); (३)-(क); (४)-(क);
(५)-(ब).

प्र.२ अचूक गट ओळखा:

(१) ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
(अ) पॅराना नदी खोरे - गियाना उच्चभूमी - ब्राझील उच्चभूमी
(ब) गियाना उच्चभूमी - अॅमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी
(क) किनारपट्टीचा प्रदेश – ॲमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी

(२) ब्राझीलच्या या नदया उत्तरवाहिनी आहेत.
(अ) जुरुका - झिंगू – अरागुआ
(ब) निग्रो - ब्रांका – पारु
(क) जापूआ – जारुआ – पुरूस

 (३) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात.
(अ) कर्नाटक – महाराष्ट्र – बुंदेलखंड
(ब) छोटा नागपूर – माळवा – मारवाड
(क) तेलंगणा – महाराष्ट्र - मारवाड

(४) भारतातील पुढील राज्यांत प्रामुख्याने पठारी प्रदेश आढळतो.
(अ) हिमाचल प्रदेश – मध्य प्रदेश – आसाम
(ब) जम्मू आणि काश्मीर – उत्तराखंड – महाराष्ट्र
(क) तेलंगणा – महाराष्ट्र – कर्नाटक

(५) ब्राझीलमधील पुढील राज्यांत गियाना उच्चभूमी विस्तारलेली आढळते.
(अ) पारा -पाराना – बाहिया
(ब) रोराइमा – पारा - सांता
(क) आमापा – सांता - सियारा

उत्तरे : (१)-(ब); (२)-(अ); (३)-(अ); (४)-(क);
(५)-(ब).

प्रश्न 3. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

(१) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ..

(i) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(iii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.

(२) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा-----

(i) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नदया आहेत.
(iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.

(३) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ......

(i) अवर्षणग्रस्त आहे.
(ii) दलदलीचे आहे.
(iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(iv) सुपीक आहे.

(४) अॅमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या
नदीच्या मुखालगत......

(i) त्रिभुज प्रदेश आहे.
(ii) त्रिभुज प्रदेश नाही.
(iii) विस्तीर्ण खाड्या आहेत.
(iv) मासेमारी व्यवसाय केला जातो.

(५) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही......

(i) मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली
आहेत.
(ii) प्रवाळबेटे आहेत.
(iii) ज्वालामुखीय बेटे आहेत.
(iv) खंडीय बेटे आहेत.

(६) अरवली पर्वताच्या पायथ्याशी ...

(i) बुंदेलखंड पठार आहे.
(ii) मेवाड पठार आहे.
(iii) माळवा पठार आहे.
(iv) दख्खनचे पठार आहे.

उत्तरे : (१)-(i); (२)-(ii); (३)-(iii); (४)-(ii);
(५)-(ii);(६)-(iii).

SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न रिकाम्या जागा


SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न उत्तरासह (रिकाम्या जागा)


प्रश्न . कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा व पुन्हा लिहा.

(1) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ........ नावाने
ओळखले जाते.
(i) लक्षद्वीप
(ii) कन्याकुमारी
(iii) इंदिरा पॉईंट
 (iv) पोर्ट ब्लेअर
उत्तर-  (iii) इंदिरा पॉईंट

(2) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या
सीमेलगत नाहीत.
(i) चिली-इक्वेडोर
(ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया
(iii) कोलंबिया-फ्रेंच गियाना
(iv) सुरीनाम-उरुग्वे
उत्तर-  (i) चिली-इक्वेडोर

(3) भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट ........... प्रकारची आहे.
 (i) लष्करी
 (ii) साम्यवादी
 (iii) प्रजासत्ताक
 (iv) अध्यक्षीय
उत्तर- (iii) प्रजासत्ताक

(४) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा ----------- या
संलग्न आहे.
 (बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ)
उत्तर- बांग्लादेश

(५)-------- ही भारताची राजधानी आहे.
(यानम, नवी दिल्ली , दीव, चंदीगढ)
उत्तर- नवी दिल्ली

(६)--------ही ब्राझीलची राजधानी आहे.
(बाहिया, ब्राझीलिया, रोन्डोनिया, रोराईमा)
उत्तर- ब्राझीलिया

(७) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे.
कारण--------
(कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब, अन्नधान्य
कमतरता)
उत्तर- प्रचंड लोकसंख्या

(८) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने---------
व्यवसायावर अवलंबून आहे.
(प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक)
उत्तर- तुतीयक

(९) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही
-------- प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
(अविकसित, विकसित, विकसनशील, अतिविकसित)
उत्तर- विकसनशील

(१०) भारतात ----------- राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
(गुजरात, गोवा, पंजाब, पश्चिम बंगाल)
उत्तर- गुजरात

(११) ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर -- -------- निर्यात
केली जाते.
(खतांची, वाहनांची, कॉफीची, यंत्रांची)
उत्तर- कॉफीची

(१२) ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी............ सर्वाधिक वापर केला जातो.
(अ) जलमार्गांचा
(ब) रस्ते मार्गांचा
(क) लोहमार्गांचा
(ड) हवाई मार्गांचा
उत्तर- रस्ते मार्गांचा

(१३) भारताच्या आर्थिक विकासास....... मोठ्या प्रमाणावर
चालना दिली आहे.
(अ) जलमार्गांनी
(ब) हवाई मार्गांनी
(क) रस्ते मार्गांनी
(ड) लोहमार्गांनी
उत्तर- लोहमार्गांनी

(१४) भारतातील--------राज्यात लोहमार्गांचे विरळ जाळे
आढळते.
(अ) उत्तर प्रदेश
(ब) महाराष्ट्र
(क) मध्य प्रदेश
 (ड) राजस्थान
उत्तर- राज्यस्थान

(१५) ब्राझीलमध्ये ------------- भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे.
 (अ) दक्षिण
 (ब) मध्य
 (क) पूर्व
 (ड) वायव्य
उत्तर- वायव्य

(१६) ब्राझीलमध्ये एकूण ------------- प्रमाणवेळा मानल्या जातात.
 (अ) दोन
 (ब) तीन
 (क) चार
 (ड) पाच
उत्तर- चार

Thursday, February 27, 2020

S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (संकल्पना व टिपा)



S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव  प्रश्न उत्तरासह (संकल्पना व टिपा)


S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह  (संकल्पना व टीपा)




प्रश्न- पुढील संकल्पना स्पष्ट करा.

१) हक्काधारित दृष्टीकोन

उत्तर---
 स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला, ही शासन पद्धती देशात रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी प्रत्येक शासनाने प्रयत्न केले,

          सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला सत्तेवर आलेल्या सरकारांचा दृष्टिकोन होता, मात्र इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन सुधारणा होऊ लागल्या.

         प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टीकोन असे म्हणतात.

२) माहितीचा अधिकार

उत्तर---
                                                 शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला.

               गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे जनतेच्या समोर येतात, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेचे उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते.

              माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले.


३) प्रादेशिकता
उत्तर---

                                       भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात.
              तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर भौगोलिक विविधता आहे, त्यामुळे प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते या  आत्मीयतेतून अस्मिता निर्माण होते. आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात यालाच प्रादेशिकता असे म्हणतात.

४) राष्ट्रीय पक्ष

उत्तर---
                                         राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेली आहेत.

 १. किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळणे किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा

२. आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा निवडून येणे आवश्यक किंवा

३. किमान चार राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

टिपा लिहा.

१) अल्पसंख्यांक विषयक तरतुदी-
उत्तर---                                                                               धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

                   अल्पसंख्यांकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.

                   अल्पसंख्यांकांची भाषा-संस्कृती लिपी धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात विविध तरतुदी करण्यात आलेले आहेत.

२) राखीव जागा विषयक धोरण
उत्तर---                                                                                 भारतीय समाजातील काही लोकसमूह हे वर्षानुवर्ष सामाजिक न्यायापासून दूरच राहिले. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी न पासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत.

                अशा लोक समूहांना स्वातंत्र्यानंतर मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते, म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याची धोरण स्वीकारले.

                 पुढे संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली. राखीव जागा विषयक धोरणामुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळवून आपला विकास करण्याची संधी मिळाली.

३) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व-
उत्तर---
                                                                                      संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री-पुरुष समानतेचे धोरण स्वीकारले.

              त्यामुळे 1952 च्या पहिल्या लोकसभेत 22 महिला निवडून आल्या होत्या. आता ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

              लोकसभेच्या एकूण जागेच्या पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या सभागृहात मांडले गेले आहे.

               स्त्रियांच्या लोकसभेतील प्रतीनिधित्वात वाढ झाल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल.

४) मतदारसंघांची पुनर्रचना
उत्तर---
                                                                    विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदार संघ तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाची असते.

                  निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले ,परंतु खेड्यातून शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते त्यामुळे मतदार संघ संतुलित राहत नाहीत.

                    म्हणून मतदारसंघांची पुनर्र्चना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.

५) मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास

उत्तर-                                                                                               1951- 52 च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेटी यांचा वापर केला जात असे.

             1998 साली पहिल्यांदा मध्यप्रदेश मधील 5, राजस्थानातील पाच व दिल्लीतील सहा अशा सोळा  विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा (ईव्हीएम) वापर केला गेला.

             2004 च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम चा नियमित वापर सुरू झाला. ईव्हीएम मशीनमध्ये मतदारांची मतदान पडताळणी पावती मिळते.

६) आदिवासी चळवळ
उत्तर---

                                                    आदिवासी समाज जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे, ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीच्या अधिकारावर गदा आणल्याने आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले होते.

                       स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाची प्रश्न सुटलेले नाहीत. वन जमिनीवरील त्यांचे हक्क, वनातील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनींवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने चालू आहेत.

७) कामगार चळवळ

उत्तर---

                                                 १८५० नंतर भारतात कापड गिरणी, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. औद्योगिकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला.

                   पुढे त्यांच्या समस्या वाढल्या या समस्या सोडविण्यासाठी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या.

                 स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक संघटना स्थापन झाल्या.

जागतिकीकरणात आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.

S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (चूक की बरोबर)




S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह 
             

                     (चूक की बरोबर)








S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (चूक की बरोबर)



(१) भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.

उत्तर- हे विधान बरोबर आहे,

कारण---

मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही.



२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

 उत्तर -हे विधान चूक आहे,

 कारण---

 या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास मदत झाली व शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.



३) जनतेचा सहभाग लक्षात घेता भारतीय लोकशाही मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाल्याचे दिसते.

उत्तर - हे विधान चूक आहे,

कारण---

 लोकशाहीतील निवडणुकांमुळे मतदारांमध्ये राजकीय जाणीव निर्माण झाली, त्यामुळे मतदान करणार्‍यांच्या संख्येतही ही वाढ झाली. जनतेच्या या राजकीय सहभागाचा विचार करता भारतीय लोकशाही ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते.



४) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाचा प्रमाणे दिसते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

 कारण---

 आवश्यकतेनुसार संविधानात संसदेला बदल करता येतो, संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाचा प्रमाणे असते.



५) सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे हे लोकशाहीचे ध्येय असते.



६) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.

 उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेता येतात.



७) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्याने किंवा निधन झाल्याने तसेच पक्षांतर केल्याने सदस्यत्व रद्द होते अशा वेळी निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोट निवडणूक घेतो.



८) एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरविते.

उत्तर - हे विधान चूक आहे,

 कारण---

 निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते, त्यामुळे हा निर्णय निवडणूक आयोग घेतो.



९) निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी.

उत्तर - हे विधान चूक आहे,

कारण---

 निवडणूका न्यायमार्गाने, खुल्या वातावरणात, भ्रष्टाचार मुक्त झाल्या नाहीत तर प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रतिनिधी निवडून येणे अशक्य होईल म्हणून निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असू नये.



१०) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हानी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.



११) राजकीय पक्ष या सामाजिक संघटना असतात.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

 कारण---

 समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात, राजकीय पक्ष समाजाची भूमिका विचारसरणी समोर ठेवून कार्य करत असतात.



१२)आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

उत्तर - हे विधान चूक आहे,

 कारण---

 आघाडी सरकारच्या काळात पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार स्थिरपणे चालू शकतात.



१३) शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे,

 कारण---

शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही, तो पंजाब राज्यापुरता मर्यादीत व प्रभावी असल्याने त्याला निवडणूक आयोगाने प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे.



१४) लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो, म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.



१५) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

उत्तर - हे विधान चूक आहे,

 कारण---

 कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यश-अपयश हे नेतृत्व वरच अवलंबून असते.



१६)ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

 अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो. ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली अस्तित्वात आला, त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्काचे जाणीव व्हावी त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.



१७) डॉ. राजेन्द्र सिंह राणा यांना भारताचे जल पुरुष या नावाने ओळखले जाते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे,

कारण---

डॉ. राणा यांनी राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात नद्या पुनर्जीवित केल्या तसेच देशभर 11000 जोहड बांधले सतत 31 वर्ष केलेल्या केलेल्या जलक्रांती मुळे त्यांना भारताचे जलपुरुष म्हणतात.

S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (संकल्पना व टिपा)


S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह 

                       (संकल्पना व टिपा)



S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न  (संकल्पना व टीपा)



प्रश्न-  संकल्पना लिहा.

(१) द्वंदवाद -

                          एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडणीला द्वंदवाद असे म्हणतात.
                    जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंदवाद असे म्हणतात.

(२) ॲनल्स प्रणाली

                    राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले, या विचारप्रणालीला ॲनल्स प्रणाली असे म्हणतात.
               ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडलली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक-आर्थिक इत्यादी सर्वांगी अभ्यास केला पाहिजे, असे म्हणणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.

(३) प्राच्यवादी इतिहास लेखन

                            अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतुहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. या अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले, या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात.

(४) राष्ट्रवादी इतिहास लेखन

                                    एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात.
                                    राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणा मिळाली ,तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

(५) वंचितांचा इतिहास

                      समाजाने त्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात.
                     मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.

(६) उपयोजित इतिहास

                     एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात.
                   इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात, तसेच या विषयांमध्ये ही इतिहासाचे उपयोजन होते.

(७) अभिलेखागार

                   ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागरांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट ,जागतिक करारांचे ऐवज इ. जतन करून ठेवले जाते.
                    अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो.
                भारतात दिल्ली येथे हे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे.

(८)  कला

                        आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते .आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते. या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते ते तेव्हा तिला कला असे म्हणतात.
                      कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते. ही मांडणी शिल्प, गायन, चित्र नुत्य व वादन अशा विविध रूपात आविष्कृत होते. कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता ,संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.

(९) मराठा चित्रशैली

                        इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. सचित्र हस्तलिखित पोथ्या व त्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणारी लाकडी फळ्यावरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा अविष्कार आढळतो.
               या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तीचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे या स्वरूपातील आहेत. वाड्यांचे दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैली तील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात,

(१०) हेमाडपंथी शैली

                 प्रामुख्याने यादव काळात महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिराची बांधणी झाली. हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चूना व मातीने भरले जात नाहीत, दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबनी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते.
                हेमाडपंथी मंदिराच्या बांधण्यात प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते. तारककृती मंदिराच्या बाह्य भिंती अनेक कोनामध्ये विभागलेले असतात. या दगडी भिंती वरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात.

    प्रश्न थोडक्यात टिपा लिहा.

(१) वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य

               लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली .सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळीला पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला.                           पाश्चिमात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचून समाजप्रबोधनाचे काम केले. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाज सुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

(२) प्रसार माध्यमांची आवश्यकता

                                       प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे कारण, त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज आहे.
                प्रसारमाध्यमामुळेच लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात माहिती व अद्यावत ज्ञानाचा प्रसार होतो. प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते. प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते.

(३) प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

                  मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यम या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे प्रसारमाध्यमांशी संबंधित असतात. वृत्तपत्रात अग्रलेख विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात.
               तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार, सादर करणारे, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ञांची ही गरज असते.

(४) मनोरंजनाची आवश्यकता

                   मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे .म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते .
                चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते .मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.

(५) मराठी रंगभूमी

                                  व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होत.
                        सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकाबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि.वा शिरवाडकर ,विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.

(६) रंगभूमी व चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

                                           रंगभूमी व चित्रपट क्षेत्रात संबंधित व्यावसायिक क्षेत्रे खालील प्रमाणे-  रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व सहाय्यक यांची गरज असते. लेखक त्यांचे सल्लागार, संगीत व भाषा यातील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते. चित्रपटासाठीही ही या सर्वांचे आवश्यकता असते.

(७) खेळणी आणि उत्सव

                                उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्याचे वाटप केले जाते.
             दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवसैनिकांच्या प्रतिमा ठेवतात .ती खेळणीच असतात. गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने लागतात. बैलपोळा, नागपंचमी अशा सणा प्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात स्पर्धा लावतात.

(८) खेळ व चित्रपट

                           पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक नायिका खेळ खेळत असल्याचे किंवा खेळाची दृश्य दाखवली जात असत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी-इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. लगान, दंगल असे क्रिकेट, कुस्ती खेळाशी संबंधित चित्रपट निघाले आहेत.
                   मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकीर्दीवर ही चित्रपट निघाले. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मुखवटा पासून आज पर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे.

(९) पर्यटनाची परंपरा

                            अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला. भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लागली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा यात्रामध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे धार्मिक पर्यटन होते.
                     व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठात शिकण्यासाठी बाहेरील देशातील विद्यार्थी येत असत. मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.

(१०) मार्कोपोलो

                  मार्कोपोलो या जग प्रवाशाचा जन्म इसवी सन १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला. तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीन पर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय.
         त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा संदर्भग्रंथ ठरला. आशियातील समाजजीवन, संस्कृतीक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.

(११) कृषी पर्यटन

                                 शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत, त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेले आहेत.
                             कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात. सिक्कीम सारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे.
                                पावसाचे प्रमाण कमी असूनही ही इस्त्रायल सारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात परदेशी लोकही येतात, यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.

(१२) स्थल कोश

                  भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही ही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात .महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
                सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थळ कोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्य, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी ,फारशी ,ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे,  स्थल कोशामुळे प्राचीन नगरांची नावे त्यांचा इतिहास कळतो.

(१३) विश्वकोश

                          महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता.
                या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादक पदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत वीस खंड प्रसिद्ध झाले आहेत. मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान सार रूपाने त्यात आणलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील विश्वकोशात करण्यात आलेले आहेत.

(१४) संज्ञा कोश

                 कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद व जागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचा अर्थ सारखेच वाटायला लागतात.
                    वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात त्यांना संज्ञा कोश असे म्हणतात संज्ञा कोषात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केले असते, संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या याची माहिती दिलेली असते.

(१५) सरस्वती महाल ग्रंथालय

                           सोळाव्या सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे हे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले. व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी ग्रंथालय अधिक समृद्ध केले.
                                या ग्रंथालयात सुमारे 49 हजार ग्रंथ आहेत, हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजी राजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.

बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा २०२६ साठी आदर्श नमुना उत्तरपत्रिका १

आदर्श नमुना उत्तरपत्रिका Model Anser Sheet रयत शिक्षण संस्थेचे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. सराव परीक्षा उत्तरपत्रिका क्र...